विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. उच्च शिक्षण विभाग आणि राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६-२७ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध केंद्रांवर पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. UPSC
याबाबत माहिती देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, राज्यातील गुणवंत आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यशदा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे येथेही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २ जुलै २०२६ आहे. सामायिक प्रवेश परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रवेश परीक्षा, पात्रता निकष, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी SIACच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Golden opportunity for UPSC aspirants
महत्वाच्या बातम्या