विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी अध्यक्ष राेहिणी खडसे यांच्यात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद अधिकच चिघळला आहे. त्यांची कुंडली बाहेर काढली तर त्यांना राजकारणाला राम राम करावा लागेल असा इशारा राेहिणी खडसे यांनी दिला आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही रोजगाराचा प्रश्न मांडला, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे घ्या असे सांगितले, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिरची लागली,” असा टोला त्यांनी लगावला.
रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मग त्या धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारायला सुरुवात केली. पण यांचे हिंदुत्व किती दुटप्पी आहे, हे लोकांनी पाहावे,” असे त्या म्हणाल्या.
काही गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख करत, “हे लोक गुंडांना पोसतात, त्यांना मदत करतात. ज्यांनी अनेकांचे जीव घेतले, अनेकांना त्रास दिला अशा लोकांना संरक्षण देणे हा हिंदू धर्म शिकवतो का?” असा सवाल उपस्थित केला.
रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे घेत राम शिंदेंवर गंभीर आरोप केले. “निलेश घायवाळ, युवराज काशीद आणि अशी आणखी अनेक नावे सांगता येतील. यांना कोणी मदत केली, हे सगळ्यांना माहिती आहे. मी जर यांची संपूर्ण कुंडली बाहेर काढायचे ठरवले, तर त्यांना राजकारणाला रामराम करावा लागेल,” असा इशाराच त्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी चौंडी येथे अधिक मासानिमित्त ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावातील मुली आणि जावयांना निमंत्रित करून पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली.
आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिर्ची लागली. मग धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारल्या. यांचं हिंदुत्व किती दुटप्पीपणाचे आहे बघा…
हे गुंडांना पोसतात, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत करतात. ज्या गुंडांनी असंख्य…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 15, 2026
मात्र, रोहिणी खडसे यांनी या कार्यक्रमावर टीका करत, “धोंडे जेवणावर खर्च करण्यापेक्षा बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करा,” असा सल्ला दिला होता. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
रोहिणी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राम शिंदे यांनीही जोरदार पलटवार केला होता. “रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे सांस्कृतिक महत्त्व काय समजणार?” असा टोला त्यांनी लगावला होता. महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.