विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेतील नऊपैकी तब्बल सहा खासदार गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Thackeray
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर बुधवारी बोलावण्यात आलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना व्हीप जारी करून बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र सहा खासदारांनी बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी सकाळी 11 वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा तास उलटूनही केवळ चारच खासदार उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले.
बैठकीला राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई, तसेच लोकसभेतील अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. दुसरीकडे, चर्चेतील सहा खासदारांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली.
बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, पक्षाने जारी केलेल्या व्हीपकडे दुर्लक्ष करून बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांविरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याबाबत ठाकरे गट गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीनंतर पक्षाच्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या प्रकरणात एक वेगळीच गुंतागुंत निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यापूर्वी दावा केला होता की, बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठीचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे व्हीप जारी होण्यापूर्वीच सादर केले आहे. हा दावा खरा ठरल्यास ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर सहा खासदारांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे मान्य झाला तर लोकसभेतील ठाकरे गटाचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात घटेल. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Operation Tiger successful, Six MPs skip Thackeray faction’s parliamentary party meeting
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला