एकाच रात्री ५ ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; २० गंभीर गुन्हे उघड

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात हत्यारांचा धाक दाखवून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या टोळीने एकाच रात्री दौंड हद्दीत ४ आणि श्रीगोंदा हद्दीत १ अशा पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकले होते. पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या धाडसी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन सराईत दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. robbery gang

या टोळीच्या अटकेमुळे पुणे ग्रामीणमधील १२ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ०८ असे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्यावर आधीच ८ गंभीर गुन्हे दाखल*), विशाल हंबरडया काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), – याच्यावर २ गंभीर गुन्हे दाखल), किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यासह एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले हा फरार आहे. त्याच्यावर ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेश काळेवर ८, विशाल काळेवर दोन गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर भारतीय न्याय संहिता (कलम ३१०(२) (दरोडा), ३११ (दरोड्यादरम्यान प्राणघातक हत्यारांचा वापर), ११८(१) (गंभीर दुखापत करणे) सह शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलिसांच्या माहितीनुसार, १० जूनच्या रात्री ६ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी दौंडच्या खोरवडी परिसरातील वस्त्यांवर धुमाकूळ घालत नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करून हत्यारांनी बेदम मारहाण केली होती. दरोडेखोरांनी तिथून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल सशस्त्र दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता.

एकाच रात्री चार ठिकाणी दरोडे पडल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागातील पोलीस स्टेशनच्या तपास पथकांची बैठक घेऊन ६ विशेष पथके तयार केली.

तपास पथकांनी मागच्या ६ महिन्यांतील जुन्नर, बारामती आणि दौंड भागातील गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना घटनास्थळापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील महामार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून हे दरोडेखोर अहिल्यानगर जिल्ह्यातून गुन्हे करण्यासाठी आले होते आणि गुन्ह्यानंतर पुन्हा तिथेच पसार झाले असल्याची खात्री पोलिसांना पटली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाला १३ जून रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे दरोडेखोर सराईत असून ते आपल्या मूळ घरी न राहता शेतात, माळावर आणि विटभट्टीवर वेषांतर करून राहत आहेत. त्यानुसार १३ जूनच्या रात्री पोलिसांनी अहिल्यानगरमधील कर्जत आणि बीडमधील आष्टी भागात एकाच वेळी छापे टाकून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींची दि. १८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली होती. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण २० गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये पुणे ग्रामीण (१२ गुन्हे), दौंड (०२ गुन्हे), यवत (०४ गुन्हे), माळेगाव (०२ गुन्हे), बारामती तालुका (०१ गुन्हा), जेजुरी (०१ गुन्हा), जुन्नर (०१ गुन्हा), आळेफाटा (०१ गुन्हा), ०४ दरोडे, ०६ जबरी चोऱ्या, ०५ घरफोड्या यांचा समावेश आहे. तर, अहिल्यानगरच्या (०८ गुन्हे), मिरजगाव (०७ गुन्हे), कर्जत (०१ गुन्हा), ०३ दरोडे, ०३ जबरी चोऱ्या, ०२ घरफोड्या यांचा समावेश आहे.

अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर चोरीचा मुद्देमाल असा एकूण बाजारमूल्याप्रमाणे २५ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेने गेल्या अडीच महिन्यांत विविध कारवाया करून एकूण ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, एसपी संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार (पुणे विभाग), अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती) व डीवायएसपी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, अभिजित सावंत, बाळासाहेब कारंडे, अंमलदार शिवाजी निकम, आसिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, तसेच दौंड पोलीस ठाण्याचे पोसई अब्दुल बिद्री, रुपेश कदम, नितीन बोराडे आणि महिला अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Inter-district robbery gang behind five armed heists in one night busted; 20 serious crimes solved

 

महत्वाच्या बातम्या