विशेष प्रतिनिधी
मुंबई: Maharashtra Govt राज्यातील खासगी तसेच सीबीएसई संलग्न शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेने निश्चित केलेल्या दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारची सक्ती कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडली.Maharashtra Govt
यासोबतच, अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात केली.
१५ जूनपासून राज्यभरात शाळा सुरू झाल्यानंतर अनेक खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तके व शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. शाळांकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याचे दर बाजारभावापेक्षा अधिक असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी होती.Maharashtra Govt
या पार्श्वभूमीवर विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, शासनाने कोणत्याही शाळेला विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्याची परवानगी दिलेली नाही.
तक्रार मिळताच थेट कारवाई
सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभाग संबंधित शाळांवर नियमानुसार कारवाई करेल. काही शाळांना याप्रकरणी आधीच नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
देखरेखीसाठी स्वतंत्र समिती
खासगी शाळांकडून पालकांची होत असलेली कथित आर्थिक लूट रोखण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी जाहीर केले. ही समिती शाळांवर नियमित देखरेख ठेवून तक्रारींची चौकशी करेल. समितीची अंमलबजावणी आणि तिच्या कार्यपद्धतीकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमधील सामूहिक कॉपी व इतर गैरप्रकारांवरही सरकारने कठोर कारवाई केली आहे. दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गैरप्रकारांप्रकरणी १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
यंदा सामूहिक कॉपीची एकूण १,४६९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून, त्यापैकी अमरावती विभागात सर्वाधिक ६५०, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ५०१ प्रकरणे आढळली. बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकारांप्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात अमरावती विभागात ८, नागपूर विभागात ३, छत्रपती संभाजीनगर विभागात ३ आणि लातूर विभागात १ गुन्ह्याची नोंद आहे.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आगामी काळात आणखी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Govt Warns Schools Against Forcing Parents to Buy Books from Fixed Shops
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी