सहकार क्षेत्राला नवे बळ: मुख्यमंत्री, विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार प्रदान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म 100 वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज आणि विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.Vidyadhar Anaskar

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सहकार गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि पदाधिकाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सव्वाशे वर्षांपूर्वीपासून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतरच्या काळात सहकारी पतपेढी, बँकिंग, कृषी, डेअरी, गृहनिर्माण, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत सहकारी संस्थांची उभारणी झाली. पहिली सहकारी पतपेढी 1904 मध्ये उभी राहिली, तर 1911 मध्ये शिखर बँकेची स्थापना झाली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, वैकुंठभाई मेहता यांसारख्या अग्रणी व्यक्तींनी सहकाराला दिलेल्या दिशा-निर्देशांचे स्मरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

आज महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून सहकाराचे सर्वाधिक व्यापक जाळे हे याच राज्यात आहे.सहकार क्षेत्राची खरी ताकद ओळखून 6 जुलै 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले, याचा विशेष उल्लेख करत फडणवीस म्हणाले, पूर्वी सहकाराला फक्त काही राज्यांपुरती मर्यादित चळवळ म्हणून पाहिले जात होते. मात्र आता सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिल्या केंद्रीय सहकार मंत्रिपदासाठी निवड झाल्याने सहकार क्षेत्राला दूरदृष्टी आणि अनुभव लाभला आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांपैकी 40 ते 45 टक्के संस्था या सहकारी गृहनिर्माण संस्था असून हा घटक दीर्घकाळ उपेक्षित राहिला होता. मात्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र अध्याय तयार करण्यात आला आहे. या आधारावर स्वयं पुनर्विकास योजना तयार करून सहकारी सोसायट्यांना स्वतःच्या पुनर्विकासाचे अधिकार देण्यात आल्याने अनेक कुटुंबांचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील मराठी माणसाचे घराचे स्वप्न स्वयं पुनर्विकासामुळे पूर्ण होत असून 400 चौरस फुटांवरून 1000 चौरस फुटांमध्ये राहायला जाणारे सभासद पाहून होणारा आनंद अवर्णनीय आहे. विद्यमान प्रकल्पांना अर्थसाहाय्य वाढविण्यासाठी सहकारी बँकांनी हजारो प्रलंबित प्रकल्पांना मदत करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.



यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, आमदार चित्रा वाघ,अभिजित पाटील, राज्य सहकारी संघाचे संचालक शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, प्रकाश दरेकर आदी उपस्थित होते. Vidyadhar Anaskar

सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार’, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’, अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत यांना ‘महिला सहकार शक्ती पुरस्कार’ तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांना ‘सहकार विभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आणि जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांना ‘सहकार प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आणि चारकोप अभिलाषा गृहनिर्माण सहकारी संस्थेचे श्रीकांत कवठणकर यांना ‘सहकार नवोन्मेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेचे आमदार नामदेव उसेंडी यांना ‘सहकार ग्राम विकास पुरस्कार’ देण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकले यांना ‘सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अमरावती येथील शरदमाई विविध कार्यकारी संस्थेचे संजय सुणे नंदुरबार येथील प्रकाशा विविध कार्यकारी संस्थेचे दिलीप पाटील आणि यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्रद्धेय आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी संस्थेचे सचिन देशमुख पारवेकर यांना ‘सहकार कृषी रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय उत्तमराव काळे आणि लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ तोताराम राजपूत यांना ‘दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ‘सहकार समाज सेवा पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष अशोक जगताप यांना ‘सहकार नेतृत्व पुरस्कार’, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे व्ही. जी. पवार यांना ‘आदर्श सहकारी संस्था पुरस्कार’, गोराई सहकारी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष ऑल्विन वसईकर यांना ‘सहकार उद्योग पुरस्कार’, दि मुंबई अन्नधान्य दल फेडरेशनचे अध्यक्ष दशरथ घनवट यांना ‘सहकार परिवर्तन पुरस्कार’ आणि मार्केटिंग फेडरेशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

Vidyadhar Anaskar Conferred with ‘Sahakar Maharshi’ Award

महत्वाच्या बातम्या