विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीचे फोन करून त्यांच्या व्यावसायिक आस्थापनावर गोळीबार करणाऱ्या टोळीविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. तब्बल 15 दिवस सुरू असलेल्या तपासात 5 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास, हजारो तासांचे सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक राज्यांमध्ये राबवलेल्या मोहिमेनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील टोळी पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. Bishnoi Gang
22 जून रोजी काही व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीचे फोन आले होते. त्यानंतर त्यांच्या एका व्यावसायिक युनिटवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर झोन 6 आणि क्राईम ब्रँचच्या विशेष पथकांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील विविध शहरांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली.
या तपासादरम्यान नाशिक, सुरत, अहमदाबाद, अजमेर, सिरसा, जयपूर, हनुमानगड, भटिंडा आणि श्रीगंगानगरसह अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. डीसीपी क्राईम आणि एसीपी क्राईम यांनी स्वतः काही दिवस संबंधित भागात मुक्काम ठोकून तपासाचे नेतृत्व केले. क्राईम ब्रँचच्या चार आणि झोन 6 च्या एका अशा एकूण पाच पथकांनी समन्वयाने ही कारवाई केली.
तपासादरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटरांची ओळख सीसीटीव्हीच्या आधारे पटवण्यात आली. त्यापैकी एकाला काही दिवसांपूर्वी राजस्थानमधून अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या शूटरला सोमवारी रात्री पंजाबमधील भटिंडा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर आरोपींना लॉजिस्टिक मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पुण्यात राहून आरोपींना माहिती पुरवणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एमसीओसी (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, धमकीचे फोन कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले होते का, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, केवळ 15 दिवसांत पुणे पोलिसांच्या पथकांनी सुमारे 5 हजार किलोमीटरचा प्रवास केला, तर सुरुवातीच्या चार दिवसांतच हजार तासांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्राईम ब्रँचच्या चार आणि झोन 6 च्या एका पथकाला प्रत्येकी एक लाख रुपये, असा एकूण पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना दिलासा देत सांगितले की, “पुणे शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे. अशा प्रकारे खंडणी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही टोळीला आम्ही खपवून घेणार नाही. शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याला सुरक्षित वातावरण देणे ही आमची जबाबदारी आहे आणि पुढेही अशा कारवाया सुरूच राहतील.”