पालखी सोहळ्यात यंदा ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

विशेष प्रतिनिधी

पुणे : ‘प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन गुरुवारी (९ जुलै) शहरात होणार आहे. पालखी सोहळ्यात सात हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहे. यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (एआय) सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात येणार आहेत, तसेच ‘फेस रेक्गनिजेशन’ कॅमेरे, ‘ॲडव्हान्स व्हिडीओ ॲनलटिक्स’ कॅमेऱ्यांचा वापर पालखी सोहळ्यात करण्यात येणार आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘ पालखी मार्ग, मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पालखी सोहळा सुरक्षित पार पडावा, यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (एआय) सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात येणार आहेत, तसेच ‘फेस रेक्गनिजेशन’ कॅमेरे, ‘ॲडव्हान्स व्हिडीओ ॲनलटिक्स’ कॅमेऱ्यांचा वापर पालखी सोहळ्यात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील प्रत्येक घडामोडींवर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी हे कॅमेरे जोडण्यात आले आहेत. वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ’



‘ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन गुरुवारी बोपखेल येथे होईल. विश्रांतवाडीमार्गे पालखी, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ, लक्ष्मी रस्तामार्गे श्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी जाईल. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुना मुंबई-पुणे रस्तामार्गे शहरात दाखल होईल. नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात पालखी मुक्कामी जाईल. पालखी साेहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन दागिने हिसकावणे, मोबाइल संच हिसकावण्याच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहे. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलिसांकडून पालखी मार्गावरील प्रमुख चौकात बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे, तसेच मुक्कामी दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था (रांग) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बाँम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दलाची पथके (क्युआरटी) तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे आगमनाबाबत माहिती देण्यासाठी यंदाही लाईव्ह लोकेशन ही लिक पोलिसांकडून समाज माध्यमात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मार्ग, तसेच मुक्कामी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे आगमन आणि प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडावा, यादृष्टीने पालखी सोहळ्याचे प्रमुख, विश्वस्त, दिंडी प्रमुख यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे,’ असे त्यांनी नमूद केले. नाना पेठ पोलीस चौकी, पालखी विठोबा मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर, रामाेशी गेट चौक, भवानी पेठ, संत कबी चौक, नाना पेठ येथे मदत केंद्रे असणार आहेत.

AI Technology Deployed for Palkhi Procession, 7,000 Police Personnel on Duty

महत्वाच्या बातम्या