विशेष प्रतिनिधी
पुणे: ओमानच्या किनारपट्टीलगत असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील एमव्ही जीएफएस गॅलेक्सी (MV GFS Galaxy) या व्यापारी कंटेनर जहाजावर १२ जुलैच्या पहाटे प्रोजेक्टाइलचा मारा झाल्यानंतर पुण्यातील मर्चंट नेव्ही अधिकारी हेरंब करमरकर बेपत्ता झाले आहेत. जहाजावर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले करमरकर हल्ल्यावेळी इंजिन रूम परिसरात ड्युटीवर असल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
प्रोजेक्टाइलचा मारा झाल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूममध्ये भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच जहाजाच्या महत्त्वाच्या भागांना वेढा घातल्याने कर्मचाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी तातडीने बचाव प्रक्रिया सुरू करावी लागली. या दुर्घटनेत जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक तासांनंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील ११ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी १० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर हेरंब करमरकर अद्याप बेपत्ता आहेत. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन, तटरक्षक दल आणि बचाव यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत असून, समुद्रात आणि जहाजाच्या परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांवरील हल्ले आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे नमूद करत, अशा घटना तातडीने थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वाधिक वर्दळीचा आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. जागतिक तेल आणि मालवाहतुकीचा मोठा हिस्सा या मार्गातून जात असल्याने या परिसरातील कोणतीही सुरक्षा घटना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करू शकते. दरम्यान, हेरंब करमरकर यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह पुणेकरांकडून प्रार्थना व्यक्त केली जात असून, त्यांच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune merchant navy officer missing after attack in Strait of Hormuz; search operation underway
महत्वाच्या बातम्या