विशेष प्रतिनिधी
धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या बनावट दूध प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त तपासात गेल्या सहा महिन्यांत सुमारे 2.3 कोटी लिटर बनावट (सिंथेटिक) दूध तयार करून महाराष्ट्रातील विविध भागांत पुरवठा केल्याचा धक्कादायक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या विक्री नोंदवहीची छाननी करण्यात आली. त्यातून 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरून 23,04,070 लिटर सिंथेटिक दूध तयार करण्यात आल्याचे समोर आले. या दुधाची अंदाजे बाजारमूल्य 9.21 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुद्ध दुधात 10 टक्के बनावट दुधाची भेसळ
तपासात उघड झाले की आरोपी प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधात 10 लिटर सिंथेटिक दूध मिसळत होते. या प्रमाणानुसार गेल्या काही महिन्यांत 2.3 कोटी लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध राज्यातील बाजारात पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
हे बनावट दूध खऱ्यासारखे दिसावे आणि त्यातील फॅटचे प्रमाण टिकून राहावे यासाठी डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची रासायनिक पावडर वापरली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या दुधाचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटूनही सर्व आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
भूमचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान 61 पोती भेसळयुक्त दूध पावडर जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात बाळासाहेब गोडगे हा संशयित अनेक डेअरींना ही पावडर पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दूध संकलन केंद्रांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय असून मोठ्या प्रमाणात बनावट दूध खरेदी करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. हा व्यवसाय जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली चालवला जात होता.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, डिटर्जंट आणि रासायनिक पदार्थ मिसळलेल्या दुधाचे नियमित सेवन केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असे दूध जीवघेणे ठरू शकते.
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार, जीवघेणी अन्नभेसळ सिद्ध झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
भूम तालुका दररोज लाखो लिटर दूध आणि 70 ते 80 टन खवा उत्पादनासाठी ओळखला जात असल्याने या घोटाळ्याचे परिणाम राज्यातील दुग्धव्यवसायावरही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Suspicion of 2.3 crore litres of toxic milk made with detergent, palm oil and chemicals in Dharashiv being sold across Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा