Moshi garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी एएलआर कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : Moshi garbage  मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी अखेर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प चालविणाऱ्या अँटोनी लारा रिन्यूएबल (ALR) कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर १२ कामगार गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९) आणि सेफ्टी ऑफिसर विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांच्यावर सदोष मनुष्यवधासह निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Moshi garbage

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन मधुकर निकम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणामुळे जीवितहानी झाल्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.Moshi garbage



फिर्यादीनुसार, मोशी कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर साठविण्यात आलेल्या एसएलएफ (Semi Land Fill) च्या ढिगाऱ्याबाबत पावसाळ्यात गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मुसळधार पावसामुळे हा ढिगारा कोसळू शकतो, याची कल्पना संबंधित कंपनीला होती. तसेच अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करणे, ढिगाऱ्याची स्थिरता तपासणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करणे, धोकादायक भागात कामगारांना प्रवेश न देणे आणि परिस्थितीचे सातत्याने निरीक्षण करणे ही जबाबदारी ALR कंपनीवर होती.

मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून कंपनीने आवश्यक खबरदारी घेतली नाही. परिणामी एसएलएफचा मोठा भाग कोसळून अनेक कामगार त्याखाली दबले. या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवितहानी झाल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.

या दुर्घटनेनंतर शहरभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. कचरा डेपोमध्ये सुरक्षेचे निकष पाळले जात होते का, धोकादायक भागात काम सुरू ठेवण्यास परवानगी कोणी दिली, तसेच पावसाळ्यापूर्वी जोखीम मूल्यांकन करण्यात आले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.

दरम्यान, महापालिकेने सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही झाली होती. मात्र, आता पालिकेच्या अधिकाऱ्यानेच फिर्याद दाखल केल्याने तपासाची दिशा बदलली असून, कंपनीच्या जबाबदारीवर अधिकृतपणे बोट ठेवण्यात आले आहे.

ALR company officials booked for culpable homicide in Moshi garbage depot tragedy

महत्वाच्या बातम्या