विद्यार्थ्यांच्या धैर्याला राज ठाकरेंचा सलाम सलाम! ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचे आंदोलन उभे केले त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता असा संदर्भ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याला सलाम केला आहे. परीक्षा पे चर्चा करता मग आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशीही चर्चा करा असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरे तर नीटसारख्या परीक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे!

राज ठाकरे म्हणतात, केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केले. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केले असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने नेले त्यावरून वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे तेच मानसिक रुग्ण झाले आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असे दिसतेय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलने कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे.



धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे हे अपयश वाटत आहे? मणिपूर पेटलेले असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असेच अभय दिले होते. बरे हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचे हे कोणी सांगायचे नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

माझी विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे. हे समजून घ्यावे की, हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचे, एका परीक्षेपुरते नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांचे भले केले जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की, मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचे मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असेच आंदोलन उभे केले होते. २०११ चे अरब स्प्रिंग, नेपाळमध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचे आंदोलन उभे केले त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम!

Raj Thackeray Salutes Students, Demands Dialogue After ‘Pariksha Pe Charcha’

महत्वाच्या बातम्या