विशेष प्रतिनिध
पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणातील गुन्ह्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर दुसरीकडे मनसे नेते बाळा शेडगे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ( Ravindra Dhangekar )
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी काही दिवसांपूर्वी गुलटेकडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ आणि सुसाईड नोटमध्ये आर्थिक फसवणूक, थकीत रक्कम आणि मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवले असल्याचे स्पष्ट झाले होते. ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या फर्मच्या प्रकल्पावरून आणि आर्थिक व्यवहारांवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, आणि वर्षा शेडगे यांच्यासह 14 जणांवर खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मात्र आता न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह विविध अटी शर्तींवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गांधी यांच्या न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच साक्षीदारांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क न साधणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
याप्रकरणात बुधवारी (दि. 22) आरोपींच्या वकिलांसह पोलीस आणि सरकारी वकिलांनी म्हणणे सादर केले होते. गुरुवारी आदेश देताना न्यायालयाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मृत बांधकाम व्यावसायिकाने उत्कर्ष असोसिएट्स, विजय बिल्डकॉन आणि अक्षय कन्स्ट्रक्शनसाठी काम केले होते. मात्र धांगेकर हे संबंधित बांधकाम संस्थांचे भागीदार नसल्याचे तसेच त्यांचा मृत व्यक्तीशी थेट व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. धंगेकर यांचे नाव केवळ त्यांच्या पत्नी प्रतिभा या उत्कर्ष असोसिएट्सच्या भागीदार असल्याच्या कारणावरून प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहे. धंगेकर हे मृत बांधकाम व्यावसायिकाला कोणतीही रक्कम देणे लागत नाही. उपलब्ध कागदपत्रे आणि प्रथम माहिती अहवालाच्या आधारे त्यांचा मृत व्यक्ती किंवा त्याच्या व्यवसायाशी थेट संबंध प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद करत धंगेकर दाम्पत्याला अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Ravindra Dhangekar: Real estate developer suicide case; relief for Ravindra Dhangekar, anticipatory bail granted.
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!