Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची ‘बीएमसी’ मुख्यालयावर कारवाई; थेट कॅन्टीनला ठोकले टाळे!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एफडीए’च्या पथकाने थेट मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील उपहारगृहावर धाड टाकून ते सील करण्यात आले आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उपहारगृहातील अस्वच्छता उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ( Tukaram Mundhe )

ताकात माशी अन् भजीत प्लास्टिक
महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहातून दररोज सुमारे 7 ते 8 हजार कर्मचारी आणि नागरिक जेवण, नाश्ता करतात. मात्र नुकतेच एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क मेलेली माशी आढळून आली. एवढेच नव्हे तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडला. या धक्कादायक प्रकारामुळे पालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.

मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही अनेकांनी या उपहारगृहात दिल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत सवाल उपस्थित केले होते. या उपहारगृहात प्रचंड अस्वच्छता पसरल्याचा आरोपही करण्यात आला होता. अनेक खाद्यपदार्थ कोणत्याही झाकणाशिवाय उघड्यावर ठेवले जात होते, ज्यावर माश्या आणि डास घिरट्या घालत होते. त्यामुळे अखेर एफडीएच्या पथकाने या उपहारगृहावर कारवाई केली आहे. राज्यातील विविध ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एफडीएने सुरू केलेल्या मोहिमेतील ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.



यापूर्वी एफडीएने मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्सवर देखील कारवाईचा बडगा उगारला होता. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, भेसळयुक्त अन्न किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात नागरिकांना सहज तक्रार करता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘एआय’ सक्षम नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

Tukaram Mundhe: Tukaram Mundhe takes action at BMC headquarters; directly seals the canteen.

महत्वाच्या बातम्या