NEET paper leak : नीट पेपरफुटीविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : NEET paper leak नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीने २४ जुलै रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असून, देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. NEET paper leak

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन जंतर-मंतर परिसरात २० जूनपासून सुरू आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला खेळ आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसून, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. NEET paper leak



 

यापूर्वी २० जुलै रोजी आंदोलकांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारले होते. आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या कारवाईत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाल्याचा दावा करण्यात आला, तर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, बुधवारी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर परिसरातून काही आंदोलक कनॉट प्लेसच्या टॉल्स्टॉय मार्गाच्या दिशेने गेले होते. त्यावेळी जमावातील काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड, काचेच्या बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात कनॉट प्लेस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक भगत जखमी झाले. तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. त्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, हिंसक प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची व्हिडिओ फुटेज आणि सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटवली जात असल्याचे सांगितले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवर हल्ला आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.
दुसरीकडे, आंदोलकांनी पोलिसांचे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे आणि नीट प्रकरणातील सत्य देशासमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केले आहे की, २४ जुलैचे देशव्यापी आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालये, शिक्षण विभागाची कार्यालये आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणी निदर्शने केली जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि हिंसक कृत्यांपासून दूर राहावे, असे आवाहनही पक्षाने केले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवली जाण्याची शक्यता आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि वाहतूक निर्बंध लागू केले जाऊ शकतात. जंतर-मंतर परिसरातही पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली असून, परिस्थितीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

Nationwide protest call today over NEET paper leak

महत्वाच्या बातम्या