विशेष प्रतिनिधी
पुणे: दिल्लीत नीट पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असताना आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्ताला अटक करण्यात आली आहे. त्याला पुणे विमानतळावर आणण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला भिवंडी येथे नेण्यात येत आहे. ( TET Paper Leak Case )
समोर आलेल्या माहितीनुसार, टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची दिशा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
25 वर्षांपासून पेपरफुटीचे रॅकेट सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला बिजेंद्र गुप्ता हा गेल्या 25 वर्षांपासून पेपरफुटीचे रॅकेट चालवत होता. त्याचे धागेदोरे देशातील अनेक राज्यांतील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांशी जोडले गेले आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी अधिक व्यापक केला असून बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही चौकशी सुरू आहे. तसेच यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी बिजेंद्र गुप्ताच्या सांगण्यावरून काम करत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
देशातील अनेक राज्यांतील पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये बिजेंद्र गुप्ता हा बऱ्याच काळापासून फरार आरोपी म्हणून घोषित होता. डीसीपी पवन बनसोडे यांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोठी कारवाई केली. भिवंडी पोलिसांच्या या सतर्कतेमुळे पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्यास मदत होणार आहे. या अटकेनंतर आता सुरू असलेल्या तपासात आणखी कोणकोणती मोठी नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका