Airlift from Armenia : आर्मेनियातून एअरलिफ्ट, इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात यश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्राएल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला असताना भारत सरकारने राजनैतिक पातळीवर चर्चा करून इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यास यश मिळविले आहे. काश्मीरमधील 90 विद्यार्थी आर्मेनिया येथून बुधवारी रात्री दिल्लीला परतणार आहेत.

इराण आणि इस्राएलमधील तणाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे शिकण्यासाठी तेथे गेलेले भारतीय विद्यार्थी तसेच नागरिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याच अंतर्गत काश्मीर खोऱ्यातील 90 विद्यार्थी बुधवारी रात्री आर्मेनिया येथून दिल्लीत पोहोचले. हे जवार्तनोत्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी उड्डाण करती. दरम्यान, या दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी परिस्थिती सांगत आपल्याला सुखरूप परत आणावे, यासाठी सरकारकडे साकडे घातले होते. उर्मिया विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला भारतात परत आणले जात आहे. येथून लवकरात लवकर बाहेर काढल्याबद्दल भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे आम्ही आभार मानतो, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.



तेहरान मेडिकल विद्यापीठ, इस्लामी आझाद विद्यापीठ आणि इराण मेडिकल विद्यापीठ, या तेहरानमधील प्रमुख विद्यापीठातून काश्मीरी विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाने सोमवारीच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. शहीद बेहेश्ती मेडिकल कॉलेजमधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना कोम शहरात हलवण्यात आले. मंगळवारी शिराज आणि इस्फहान मेडिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हलवण्यात आले. भारतीय दूतावासाने अराक विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सहाय्य करण्याची मदत केली. तसेच भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना घरात थांबण्याचे तसेच भारतीय दूतावासाच्या अधिकृत टेलिग्राम लिंकवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले होते.

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदूताशी चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांना आर्मेनियाच्या सीमेवरील नॉरदूज चौकीतून बसेसमधून बाहेर काढले जाईल. इराणमध्ये दीड हजार काश्मीरी विद्यार्थ्यांसह जवळपार 10 हजार भारतीय अडकले आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत देशातील सगळे विमानतळ बंद आहेत, मात्र भू-सीमा चालू आहेत.

इराणची सीमा सात देशांना लागून आहे. हे देश आहेत पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, अजरबैजान, आर्मेनिया, तुर्कस्थान आणि इराक. याशिवाय ओमानसोबत त्यांनी सागरी सीमा लागून आहे. आर्मेनियाची सीमा इराणमधील प्रमुख शहरांपासून फार लांब नाही. तसेच आर्मेनिया सोबत भारताचे संबंध चांगले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान संरक्षण करार देखील झाले आहेत. राजकीयदृष्ट्या आर्मेनिया स्थिर आहे. शिवाय, तेथून भारतीयांना वेगाने भारतात परत आणणे शक्य होणार आहे, कारण येरेवन विमानतळ सुरू आहे. इराण आणि आर्मेनिया दरम्यान देखील कसलाही तणाव नसल्याने भारतीयांना परत आणण्यासाठी या देशाची निवड करण्यात आली आहे.

Airlift from Armenia successfully brings back Indian students from Iran

महत्वाच्या बातम्या