डीआरआयच्या उपसंचालकांना ‘डी-कंपनी’ आणि दाऊद सिंडिकेटच्या नावाने धमकी

विशेष प्रतिनिधी

पुणे : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (‘डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’च्या (डीआरआय) पुणे युनिटच्या उपसंचालकांना चक्क ‘डी-कंपनी’ (दाऊद इब्राहिम सिंडिकेट) आणि ३० वर्षांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीकडून कुटुंबीयांसह उडवून देण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली आहे. तस्करांचे जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईल सोडवण्यास नकार दिल्यामुळे हा हायप्रोफाईल धमकीचा प्रकार घडला. “मी गेल्या तीन दशकांपासून दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो,” असे सांगून आरोपींनी डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. Dawood syndicate

मुश्ताक शेख याच्यासह अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पुणे प्रादेशिक युनिटच्या ३३ वर्षीय उपसंचालकाने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५१, ३५१(४), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २०२४ पासून पुण्यात ‘डीआरआय’चे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. ३ मे २०२६ रोजी ते आपल्या मूळ गावी सुट्टीवर असताना त्यांना आरोपी मुश्ताक शेख याने फोन करून “मी तुमचा बातमीदार मेहमूद याला ओळखतो, मला तुमच्यासाठी इन्फॉर्मर (बातमीदार) म्हणून काम करायचे आहे,” असे सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर ५ मे रोजी रात्री फिर्यादी हे पाटणा विमानतळावर असताना मुश्ताक शेखने त्यांना पुन्हा फोन केला आणि त्याचा मुख्य हेतू समोर आणला. तो म्हणाला, “माझे काही लोक दुबईवरून भारतात येत असताना मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिट आणि कस्टम विभागाने आमचे महागडे लॅपटॉप आणि मोबाईल फोन पकडले आहेत. तुम्ही कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आमचा हा तस्करीचा माल सोडून द्या.” मात्र, कर्तव्यदक्ष उपसंचालक यांनी या बेकायदेशीर कामासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला.



माल सोडवण्यास नकार दिल्याने आरोपी मुश्ताक शेखचा जळफळाट झाला. ६ मे २०२६ रोजी पहाटे ०३:४० च्या सुमारास त्याने उपसंचालक यांच्या व्हॉट्सॲपवर सलग १३ धमक्यांच्या ऑडिओ क्लिप पाठवल्या. “तुम्ही मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटला माहिती दिल्यानेच माझ्या लोकांवर कारवाई झाली आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी करत आहे, मला आजपर्यंत कोणीही थांबवू शकलेले नाही. माझे मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी थेट संबंध आहेत. आता तुम्ही आणि तुमची फॅमिली पुणे शहरातून बाहेर जिवंत कशी पडते तेच मी बघतो. मी तुम्हाला चांगला धडा  शिकवणार आहे, ‘मैं तुमको दिखाता हूँ, तुम्हारे बाप का राज है क्या’?” अशी भाषा वापरून त्याने पंतप्रधानांच्या कार्यालयात देखील खोटी तक्रार करण्याची धमकी दिली.

धमकीचे सत्र एवढ्यावरच थांबले नाही, तर ६ मे रोजी संध्याकाळी १७:२४ वाजण्याच्या सुमारास उपसंचालक यांना दुसऱ्या एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. फोनवरील अनोळखी व्यक्तीने त्यांना धमकावताना सांगितले की, “मी गेल्या ३ दशकांपासून (३० वर्षांपासून) थेट दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो. मी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासाठी देखील एक परिचित आणि रेकॉर्डवरील चेहरा आहे.” या अंडरवर्ल्डच्या हस्तकाने केवळ उपसंचालक यांनाच नव्हे, तर डीआरआय पुणे प्रादेशिक युनिटच्या संपूर्ण सरकारी कार्यालयाला आणि सर्व कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

या गुन्ह्याची प्राथमिक नोंद अदखलपात्र स्वरूपाची असल्याने, कायद्यानुसार पुढील तपासासाठी आणि आरोपींच्या तातडीच्या अटकेच्या वॉरंटसाठी न्यायालयाची अधिकृत परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाठ करत आहेत.

DRI deputy director threatened in the name of D-Company and Dawood syndicate

 

महत्वाच्या बातम्या