Indian students इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना केले जाणार आर्मेनियातून एअरलिफ्ट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू असून या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना बसतो आहे. युद्धसदृश हालचाली वाढत असतानाच, इराण सरकारने सोमवारी परदेशी नागरिकांना देश सोडण्याची अधिकृत परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर भारतानेही तातडीची पावले उचलत आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आर्मेनियामार्गे एअरलिफ्ट करण्याची योजना आखली आहे.Indian students

इराणमध्ये सध्या सुमारे १०,००० भारतीय नागरिक अडकले असून त्यामध्ये १,५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमधील बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहेत. अशा स्थितीत थेट विमान उड्डाण करून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे अशक्य असल्यामुळे, भारताने जमीनमार्गाने पर्याय शोधत आर्मेनियामार्गे सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेनुसार, भारतीय व परदेशी विद्यार्थी आर्मेनियाच्या नोर्डुझ सीमापर्यंत बसने आणले जातील. तेथून येरेवन विमानतळावर नेण्यात येऊन विमानाद्वारे भारतात आणले जाणार आहे. यासाठी भारताने आर्मेनियाच्या राजदूतांशी समन्वय साधला असून, इराणमधील विविध शहरांमधून विद्यार्थ्यांना हलवण्याचे नियोजन सुरू आहे. Indian students

इराण सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे की देश सोडण्यापूर्वी परदेशी नागरिकांनी आपले नाव, पासपोर्ट क्रमांक, वाहन तपशील, निघण्याची वेळ आणि कोणत्या सीमेमार्गे जाणार हे सर्व इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला राजनैतिक मिशनमार्फत कळवणे बंधनकारक आहे.

इराणच्या सीमारेषा पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, तुर्की, इराक आणि आर्मेनियाशी जोडलेल्या आहेत. परंतु यातील बहुतेक पर्याय भारतासाठी अविश्वसनीय किंवा धोकेदायक ठरू शकतात. पाकिस्तान आणि अझरबैजानने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे ते पर्याय वगळले गेले. इराक आणि तुर्कीमध्येही तणावपूर्ण परिस्थिती आणि भारताशी असलेले संशयाचे संबंध लक्षात घेता, आर्मेनियाच सर्वात सुरक्षित पर्याय ठरला आहे. शिवाय आर्मेनियाचा भूप्रदेशीय भाग इराणच्या मुख्य शहरांपासून जवळ आहे. भारत आणि आर्मेनियाचे संरक्षण आणि राजनैतिक संबंध स्थिर आणि मैत्रीपूर्ण आहेत. येरेवन विमानतळ पूर्णतः कार्यरत आहे व तेथून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत.

गेल्या तीन दिवसांतील इस्रायली हल्ल्यांमुळे राजधानी तेहरानमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिक शहर सोडण्यासाठी धडपडत असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी रांगेत उभं राहूनही इंधन मिळत नाही. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, केवळ तेहरानमध्ये २०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.लोकांनी घाबरून अन्न, पाणी आणि इंधनाची साठवणूक सुरू केली आहे. अनेक नागरिकांनी सुरक्षित भागांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

Indian students in Iran to be airlifted from Armenia

महत्वाच्या बातम्या