क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.
याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळे राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. Manikrao Kokate

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट शब्दांत नमूद केले की, कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. मंत्री असो वा सामान्य व्यक्ती, कोणालाही वेगळा न्याय लागू होत नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर हजर राहावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी. सुनावणीदरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती अ‍ॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी न्यायालयासमोर केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.



माणिकराव कोकाटे यांनी मागील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहणे अपेक्षित असताना ते अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांकडून कोकाटे अटक टाळण्यासाठी मुद्दाम गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात आला. आजच्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कोणतेही वैद्यकीय कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. याउलट, याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित असल्याचा दावा केला.

या सर्व घडामोडींमुळे कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असून, अजित पवार त्यांना राजीनामा देण्यास सांगणार का, यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीत या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय अजित पवारांनीच घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली. जर उच्च न्यायालयाकडऊन शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, तर कोकाटेंचे खाते पुढे कोणाकडे द्यायचे, याचाही थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

Arrest warrant issued against Sports Minister Manikrao Kokate

महत्वाच्या बातम्या