दिवसभर सिनेमे, मित्रांसोबत गप्पा यापलीकडे मुंबईसाठी काय केले? आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा-जिलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या, यापलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केले? जेव्हा मुंबईकर २६ जुलैच्या पुरात अडकले होते, तेव्हा हे दोघे कुठे होते? कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते, तर कोणी बंगल्यावर. लोकांसाठी हे कधीच रस्त्यावर उतरले नाहीत, असा हल्लाबाेल भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर केला आहे. Ashish Shelar

ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर शेलार म्हणाले, मुंबईच्या संकटात ठाकरे बंधू कधीच जनतेच्या मदतीला धावले नाहीत. मुंबईकरांनी आता या दोघांनाही ओळखले आहे. “ज्यांनी कधी मुंबईकरांचे दुःख पाहिले नाही, त्यांना आता मुंबईकर मतदान करणार नाहीत. २०१४ आणि २०१७ मध्येही त्यांनी ‘फेक नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारले. आजही हे दोन्ही भाऊ अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसले आहे.

राज ठाकरे यांनी ‘भाजप मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल’ असा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, राज ठाकरे यांनी मुलाखत देण्याआधी चंडू खान याची डॉक्युमेंट्री बघितली असेल. या डॉक्युमेंट्रीमध्ये अशा गोष्टी दाखवतात, ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, तोवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही. विषय असेल, तर तो ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघत आहोत, शुभा रावळ ते संतोष धुरी यांना सोडून चालली आहेत. त्यांच्या सोबतची अनेक लोक त्यांच्या मतांवर आणि त्यांनी मांडलेल्या विषयांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, त्यामुळे मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच नाही.



राज्यातील सरकार दिल्लीच्या आशीर्वादाने बसवले या राज ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देताना शेलार म्हणाले, तुमच्या घरातील व्यक्तीला (अमित ठाकरे) तुम्ही निवडणुकीत जिंकवू शकला नाहीत, लोकांनी त्यांना घरी बसवले. आणि विशेष म्हणजे ज्यांनी त्यांना घरी बसवले (उद्धव ठाकरे गट), त्यांच्याशीच तुम्ही आता हातमिळवणी केली आहे. सत्तेवर टीका करण्याआधी तुमच्या घरातील लोकांना कोणी पाडले, ते आधी बघा.

ही निवडणूक केवळ ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वाची नसून मुंबईच्या विकासाची आहे. “मुंबईकर आता अहंकाराला स्थान देणार नाहीत. ही निवडणूक मराठी संस्कृती आणि विकासाची आहे. यामध्ये मुंबईची जनता पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत कुठे जायचे असेल, तर एक ते दीड तास लागतो. त्यामुळे मी मुंबईकर असल्याची लाज वाटते, असे महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत म्हटले. यावर आशिष शेलार यांनी महेश मांजरेकर यांंनाही सुनावले. मांजरेकर हे एका पक्षाचा प्रचार करत असतील, आमचे काही म्हणणे नाही. पण अभिनेता म्हणून आपण निपक्ष असल्याचे दाखवून एका पक्षाच्या प्रचारासाठी बोलत असतील, तर त्यांनाही सडेतोड उत्तर देऊ. मांजरेकरांनी अटल सेतू, कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का? ते ॲक्वा मेट्रोतून कधी फिरलेत का? त्यामुळे महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये. त्यांना राजकारणात पडायचे असेल, तर घोषित करावे.

Ashish Shelar Questions the Thackeray Brothers

महत्वाच्या बातम्या