विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचं काहीही कारण नाही. मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला.माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिले आहे.
घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला. विरोधकांकडून टीका होत आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होत आहे. यावर भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे की , मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतंय. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचं काहीही कारण नाही.
भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचं जीवन चालतंय. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचं अध्ययन करावं. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असंच आम्हाला वाटतं. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.
या विधानाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका पक्की असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे.
भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची मी मुख्यमंत्री असताना केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा आली नाही तरी चालेल, असे बोलणाऱ्यावर कायद्याचा बडगा उगरला, तर परत असे कुणी बोलणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी किंवा पाप मान्य करावे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Bhayyaji Joshi clarified that there is no disagreement about Marathi as the language of Mumbai
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल