विशेष प्रतिनिधी
साेलापूर : नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, अशा शब्दांत भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांना इशारा दिला आहे. Jaykumar Gore
सोलापूर जिल्ह्यातील वाडी कुरोली येथे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समाधान काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या विजयाचे रहस्य उलगडत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाभारतात कौरवांनी श्रीकृष्णाची संपूर्ण सेना घेतली. पण पांडवांनी एकट्या श्रीकृष्णाला निवडले. नंतर याच श्रीकृष्णाने युद्ध सुरू होण्यापूर्वी 6 महिने निवडक सोबत्यांना सोबत घेऊन अचूक रणनीती कौरवांच्या दिग्गज योद्ध्यांना निष्प्रभ केले. आज काळ बदलला तरी याच पद्धतीने भाजप निवडक योद्ध्यांना सोबत घेत विजयाचा मार्ग आखते.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, त्याला वाटते समोरचे सर्वजण वेडे आहेत. आपण सर्वांना फसवू शकतो. समोरच्याला काहीही कळणार नाही. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी. भाजपने छत्र काढले, तर आपले काय होईल? कुणाचाही नाद करा, पण देवाभाऊंचा नाद करू नका. काही नेत्यांना मिळालेले यश पचवता येत नाही. आम्ही 4 टर्मचे आमदार आहोत. पण काही लोक आपली कुवत विसरून भाजपला संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांनी पहिल्यांदा स्वतःची ताकद ओळखावी. काही नेते म्हणतात भाजपला संपवायचे आहे. पण भाजपला संपवणारा अजून जन्मालाच यायचा आहे, असे ते म्हणाले.
जयकुमार गोरे यांनी 2 दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवरही टीका केली होती. ते म्हणाले होते, मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केले. शिंदेंनी आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे प्रणिती शिंदेंनी केले. काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्यावेली त्यांची गरज होती, त्यावेळी त्या त्यांना वाऱ्यावर सोडून निघून गेल्या. त्यामु्ळे आता 2 नगरसेवक आले तरी त्यांना समाधान वाटत आहे.
प्रणिती शिंदे 87 नगरसेवक आलेल्या भाजपवर टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचे काही कारण नाही. एवढा मोठा पराभव त्यांनी स्वीकारायला हवा. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे टीका त्यांनी केली. पण लोकसभेला तुम्ही कुठे – कुठे चर्चा करण्यासाठी गेला होता, हे मला सांगायला भाग पाडू नका. मी संधीसाधू आहे किंवा नाही हे भाजपला माहिती आहे. ताईंनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वतःचे 2 नगरसेवक त्यांनी टिकवून दाखवावे, असे गोरे म्हणाले होते.
Challenge Anyone You Want, But Not Devabhau,” Jaykumar Gore Warns Abhijeet Patil
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला