विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण पार पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे ३००० बसांचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे.
पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता.
CM Devendra Fadnavis Launches ST Corporation’s ‘Rajmata Jijau’ Bus Service
महत्वाच्या बातम्या