विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला . लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर साधला आहे.
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले आहेत. भाजप राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला निकाल म्हणजे जामखेड नगरपरिषदेचा. येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आणि रोहित पवारांना मोठा धक्का बसला.
या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, इतकी मेहनत घेऊनही मिळालेला हा निकाल निराशाजनक आहे आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांमुळेच हा पराभव झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवर काही ठिक नसल्याचे दिसत आहे.
जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.
आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते… मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Congress Aiding BJP Despite Secular Claims, Says Rohit Pawar, Calls Party BJP’s ‘B-Team’
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला