चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील , मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचीच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ठणकावून सांगितले Devendra Fadnavis

विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली राज्य आहे. कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. हा १०६ हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, मुंबई वेगळी केली जाईल, अशी कुणीही मनात आणू नये. कारण निवडणुका आल्यानंतर अशाप्रकाराची टीका होत असते. म्हणून या सभागृहात मी निश्चितपणे सांगतो की, मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचीच राहील. आपले दैवत छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या तत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्गाने आपला महाराष्ट्र चालत राहील.

सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही. परंतु, देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला, तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्थ ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. राज्याच्या विकासासाठी कर्ज उभारावेच लागते. प्रत्येक राज्य ते उभारते. त्यामध्ये रिझर्व्ह बँक आणि एफआरबीएमने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. २५ टक्क्यांच्या तर गेलो, तर अर्थव्यवस्था कुठतरी अडचणीत आली, असा त्याचा अर्थ होतो. पण २०२५-२०२६ च्या आपल्या अर्थसंकल्पीय अंदाजांचा आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला, तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या १८.८७ टक्के एवढेच कर्ज घेतलेले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आम्ही अनेक योजना सुरू केल्या. निवडणूक झाल्यानंतर या योजना बंद होतील, असे लोक म्हणायचे. मात्र, कुठलीही योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरू आहेत. पुढेही संपूर्ण पाच वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले.

सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ होता. तर मुघलांचा इतिहास १७ पाने होता. आता हा इतिहास बदलला असून, सीबीएसईने नवीन पुस्तकांमध्ये छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा २१ पानांचा इतिहास घेतलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Devendra Fadnavis slams the opposition

महत्वाच्या बातम्या