गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सायबर फ्राॅडची तक्रार पहिल्या तासात म्हणजे गाेल्डन अवरमध्ये नाेंदविल्यास पैसे रिकव्हर केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. असा फोन आला तर थेट त्याच क्षणी १९३० या नंबरवर कॉल करा. हा सायबरचा नंबर आहे. मोठी व्यवस्था उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत डिजिटल अरेस्टबाबत समाजवादी पक्षाचे सदस्य आमदार अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. देशात डिजिटल अरेस्ट घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात लोक याला बळी पडत आहेत. त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. या घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली पाहिजेत, जनजागृतीची व्याप्ती वाढवली पाहिजे, असे सांगत अबू आझमी यांनी याकडे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, डिजिटल अरेस्टविरोधात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत.



रिंगटोनवरही जाहिराती आहेत. तरीही रोज प्रत्येक दिवशी फसवणूक होत आहे. डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा आहे. कोणालाही फोन आला तर थेट १९३० वर तक्रार करावी. या सभागृहातील चर्चा राज्यभरात जाते, म्हणून या माध्यमातून या सभागृहातील सदस्यांना तसेच राज्यातील नागरिकांना सांगतो की, डिजिटल अरेस्ट असा प्रकारच नाही. कायद्याने कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्याच क्षणी समजून घ्यावे की, हा फ्रॉड आहे. १०० टक्के हा फ्रॉड आहे. कोणत्याही कायद्यान्वये कोणीही कोणाला डिजिटल अरेस्ट करू शकत नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, एक फोन येतो किंवा व्हिडिओ कॉल येतो, त्यावर समोर बसलेला माणूस स्वतःला सीबीआय किंवा पोलीस अधिकारी सांगतो. मग तिथून तो म्हणतो की, तुम्ही पार्सल मागवले का? त्यात ड्रग्स सापडले आहेत. तुम्हाला जागचे हलण्याचीही परवानगी दिली जात नाही. तुम्हाला स्क्रीनपुढेच राहायला सांगितले जाते. त्यातून सुटण्याकरिता पैसे पाठवण्याची मागणी केली जाते. मग सामान्य माणूस घाबरून पैसे ट्रान्स्फर करतो. डिजिटल अरेस्ट प्रकरणात फक्त सामान्य माणूस नाही तर अनेक मोठे अधिकाही, निवृत्त अधिकारीही अडकले जातात. पीडितांनी पैसे पाठवले की ते पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये तत्काळ ट्रान्सफर केले जातात, मग ते विदेशातील खात्यात पाठवले जातात. अनेक प्रकरणात असे लक्षात आले आहे की, पूर्ण ऑपरेशन विदेशातून होते.

If a complaint of cyber fraud is received during golden hour, money will be recovered, assures Chief Minister

महत्वाच्या बातम्या