विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंधेरीतील चार बंगला परिसरातील नवजीतनगर रहिवाशी संघातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 2 जून रोजी कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत दोन महिलांचाही समावेश होता. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेला हा मुद्दा मनीषा कायंदे यांनी आज (23 मार्च) विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांना मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेश द्यावे लागले.
प्रश्नोत्तराच्या तासाला मनीषा कायंदे म्हणाल्या की, अतिशय गंभीर दूध भेसळीचा प्रकार आहे. केवळ दुधाचाच प्रश्न नाही, तर दुधापासून तयार होणारे अन्य दुग्धजन्य पदार्थ जे आहेत. पनीरचा विषय असेल, मावाचा विषय असेल, अनेक पदार्थ दुधापासून तयार होतात आणि ते थेट मनुष्याच्या जीविताशी संबंधित आहेत. अशा वेळेला अनेक प्रकरण घडत असताना अंधेरीमध्ये हा प्रकार जो घडला आहे, तो अत्यंत वाईट आहे. अंधेरीच्या विषयामध्ये तर स्वतः लोकांनी जाऊन तक्रारी केल्या आणि त्यात अर्थात एक पोलीस पण होते. स्थानिक रहिवास्यांनी जे दूध भेसळ करत होते, त्यांचे संभाषण ऐकलं आणि त्यानंतर चर्चा करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु मंत्री नरहरी झिरवाळ यांनी जे उत्तर दिलेलं आहे. अशा आरोपींवर भारतीय न्यायसहितेच्या कायद्याखाली आणि फूड अँड ड्रग जे कायदे आहेत त्याच्या कायद्याखाली गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे गुन्हेगारांना काही काळ शिक्षा होऊ शकते. मात्र अशा गुन्हेगारांना दंड देखील फार कमी आहे. दुसरी गोष्ट हे सगळे नॉन बेलेबल ऑफेंस आणि बेलेबल ऑफेंस आहे. त्यामुळे हे सगळे लोक सुटतात. त्यामुळे माझे दोन- तीन प्रश्न आहेत.
मनीष कायंदे म्हणाल्या की, राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने मागील जुलै महिन्यात पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचा नवीन कायदा आणण्याची घोषणा केली होती, तो कायदा सरकार कधी आणणार आहे? आणि असा कायदा नसल्यामुळेच जी प्रकरण उघडकीस येतात, त्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळतो आणि ते सुटतात. काल परवाचीच एक बातमी आहे की, आंध्रपदेशामध्ये विविध केमिकल्स दुधामध्ये टाकल्यामुळे लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे आपण अशा प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? तसेच माझा तिसरा मुद्दा आहे की, फूड इन्स्पेक्टरच्या 45 टक्के जागा रिकाम्या आहेत. त्या कधी भरल्या जाणार आहेत? कारण फूड इन्स्पेक्टर नसले तर छापे कोण टाकणार. कारण अनेक प्रकरणात फुट पॅकेटवरील लेबल बदलले जातात, एक्सपायरी डेट बदलली जाते, फुट पॅकेटसोबत छेडछाड केली जाते. त्यामुळे तुम्ही कायदा कधी आणणार? आणि रिकाम्या फूट इन्स्पेक्टरच्या जागा कधी भरणार असे प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केले.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, मनीष कायंदे यांनी मांडलेली बाब अतिशय खरी आहे. मागच्या काळात वर्सोवा आणि अंधेरी या ठिकाणी छापा टाकला गेला. त्यावेळी निदर्शनास आलं की, अमुल आणि गोकुळ ब्रँडमध्ये भेसळ झाल्याचे समोर आले. त्यामध्ये मिक्सिंग करून अगदी काटेकोरपणे लेबल तोडून किंवा पिशवी फोडून आणि त्याच्यात पाणी वगैरे मिक्स करून ते विकल्याच निदर्शनास आलं आहे. त्या बाबतीत 14 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, चार लोकांवर तडीपाराची कार्यवाही सुरू आहे. मनीषा कायंदे यांनी फुड इन्स्पेक्टर भरतीसंदर्भात जो मुद्दा उपस्थित केला. ते अगदी खरं आहे. एकूण 1271 आस्थापना कार्यरत आहेत आणि आकृतीबंधानुसार 2544 पदे अपेक्षित आहेत, तर त्याच्यात 1273 पदे आपल्याला अजून वाढ करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने वित्त विभागाकडे तशी फाईल दिलेली होती. पण काही त्रुटी काढून ती फाईल रिटर्न आलेली आहे. मात्र लवकरात लवकर ती पदभरती करण्याची कार्यवाई केली जाईल. तसेच मागच्या काही काळात 197 लोकांची आपण नव्याने भरती केली आहे. त्यांच ट्रेनिंग घेऊन आता त्यांना पदस्थापना देखील देण्यात आलेली आहे. एकूण 350 पदांपैकी खूप जागा रिक्त होत्या, मात्र 189 भरल्यामुळे आता फक्त 30 जागा खाली असून पदे वाढवण्याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात येईल, अशी माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली.
मात्र काँग्रेस आमदार भाई जगताप आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कारवाईच्या माहितीवर आक्षेप घेतला. दोन्ही नेत्यांनी दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका अतंर्गत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र नरहरी झिरवाळ यांनी मकोकाअंतर्गत कारवाई करता येते का? हे पाहावे लागेल, असे उत्तर दिले. मात्र भाई जगताप आणि अनिल परब यांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर नरहरी झिरवाळ म्हणाले की, आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन मोकोकाची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
MCOCA Action Against Milk Adulterators; Minister Assures After Opposition Uproar
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास