Raj Thackeray : मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे झालेत व्यथित, संजय राऊत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray कल्याण-डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेतला आहे. मात्र, स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व्यथित झाले आहेत. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही. जर स्थानिक लोकांनी पक्षाविरुद्ध जाऊन निर्णय घेतला असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.



कल्याण डाेंबीवलीमध्ये मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे मनसेच्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाबराेबरच्या युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली असताना, कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या नगरसेवकांना विश्वासात घेत थेट शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.

या पाठिंब्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे त्यावर राज ठाकरे खूप नाराज आहेत. राज साहेब म्हणतात की ही माझी भूमिका नाही. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही… जर स्थानिक लोकांनी पक्षाविरुद्ध जाऊन निर्णय घेतला असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. उदाहरणार्थ, अंबरनाथमध्ये जेव्हा 12 काँग्रेस नगरसेवक भाजपसोबत गेले तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आमच्या पक्षातही जो कोणी आमच्याविरुद्ध काम करतो त्याला काढून टाकले जाते.

या सर्व राजकीय हालचालींबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच माहिती होती, असा दावा करत संजय राऊत म्हणाले, काही लोक राजकारणात काही मिळालं नाही तर मी सोडून जातो, या मानसिकतेने वागतात. ही मानसिक अस्थिरता राजकारणासाठी घातक आहे. ही माझी किंवा आमच्या पक्षाची भूमिका नाही, असं राज ठाकरे यांनीही स्पष्ट केल्याचं राऊत यांनी सांगितलं. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला गेला असून, त्यात पक्षप्रमुखांची थेट भूमिका नव्हती, असंही राज ठाकरे यांचे मत आहे.

दरम्यान, पळवापळवीचे घाणेरडे राजकारण हाेऊ नये तसेच कल्याण डाेंबीवलीच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची भूमिका राजू पाटील यांनी मांडली आहे. राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

Raj Thackeray is upset because MNS supported Shinde group, claims Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या