रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे: आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणी करत आहेत. अनेक उच्चपदस्थांची ते नावे घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली Rohit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करुन केलेला घातपात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करावी तसेच या प्रकरणाची फौजदारी चौकशीही करावी, तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांना पदावरुन दूर करावे, अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे.



सुळे म्हणाल्या की, “अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र आहे. आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.”

त्या म्हणाल्या की, “व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.”

Supriya Sule Demands State Government Take Full Responsibility for Rohit Pawar’s Security

महत्वाच्या बातम्या