Raigad : रायगडमध्ये तटकरे- गाेगावले समर्थक भिडले, अजित पवार गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत तुफान राडा

विशेष प्रतिनिधी

रायगड : नगर परिषद- नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने रायगडजिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहचला आहे. मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली.

सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते. त्याच ठिकाणी विकास गोगावले समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. सुशांत जाबरे यांना गोगावले समर्थकांकडून मारहाण झाली. जाबरेंनी बंदूक दाखवून विकास गोगावलेंना धमकावल्याचीतक्रार करण्यात आली आहे.



सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुकीत शांतता राहणे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. मात्र तिथले युवा नेते म्हणवणारे आज सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर स्वत: आत जात होते. तिथे निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. लोकशाहीत हे चुकीचे आहे. मतदान केंद्रावर जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यापुरता मर्यादित असतो. इतरांना तिथे प्रवेश नसतो. मात्र तरीही महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशी गुंडगिरी होतेय, धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे.

प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. तसेच जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा माणसं या प्रवृत्तीकडे वळतात. ज्यांची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार, प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. मतदान केंद्रावर हे स्वत: महाशय जातात, हे मी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातले होते. तिथल्या पोलीस निरिक्षकांच्या कानावर घातले. जो त्या शहरातील मतदारही नाही तो मतदान केंद्रावर जात होता. लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.

लोकसभा, विधानसभेची आठवण नेत्यांनी ठेवली पाहिजे. सुनील तटकरेंनी त्यांची बाजू मांडली तशी भरत गोगावले यांचीही काही बाजू असेल. तेदेखील योग्य असेल. कार्यकर्ते एकमेकांना भिडणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे होती. हे वातावरण युतीसाठी पोषक नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Tatkare-Gegavale supporters clashed in Raigad, violent clash between Ajit Pawar group and Shinde group workers

महत्वाच्या बातम्या