दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार?

विशेष प्रतिनिधी

हिंगोली: राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात असलेले काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या सध्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे.

पुढील काही दिवसांतच सातव कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश करणारअसल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. पण 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी, 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे.

राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती.

Will MLA Pragya Satav, wife of late leader Rajiv Satav, join BJP

महत्वाच्या बातम्या