Manikrao Kokate : कोकाटेंची अटक टळली, मात्र शिक्षा कायम, हायकोर्टाकडून १ लाखांचा जामीन; आमदारकीवर टांगती तलवार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manikrao Kokate सुमारे तीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात शासकीय सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांत फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरलेले माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती आर. एन. लठ्ठा यांच्या एकलपीठाने कोकाटे यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, मात्र शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे कोकाटे यांची तुरुंगवारी सध्या टळली असली, तरी त्यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार कायम आहे.Manikrao Kokate

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अॅड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलावर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने जामीन मंजूर केला, मात्र कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.Manikrao Kokate



दरम्यान, कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असताना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच कोकाटे यांच्याकडील खाते अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत लीलावती रुग्णालयाने माहिती दिली आहे. कोकाटे यांना परवा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवून उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर अँजिओग्राफी करण्यात आली, ज्यामध्ये चार रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे त्यांना बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की, रुग्णाला विनाकारण दाखल करण्यात आलेले नाही. आवश्यक वैद्यकीय कारणांमुळेच कोकाटे यांना दाखल करण्यात आले असून बायपास शस्त्रक्रियेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोकाटे यांच्यावतीने अनिकेत निकम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सध्या तरी या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

Arrest Averted for Kokate, Sentence Stands; High Court Grants ₹1 Lakh Bail, MLA Status at Risk

महत्वाच्या बातम्या