विशेष प्रतिनिधी
मुंबई : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुती सरकारमधील मंत्रीच हिंदी सक्तीच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या एका बॅनरची चर्चा सुरू असून यामध्ये भाजपाचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो वापरण्यात आला आहे. Hindi compulsion
राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्यासाठीची सक्ती करण्यात येत आहे. पण या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकण्यासाठी सक्ती करण्याचे गरजेचे नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे या निर्णयाच्याविरोधात येत्या 5 जुलैला विरोधक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सुद्धा हिंदी सक्तीला विरोध केल्याचा दावा मनसेने केला आहे . शनिवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी हिंदी भाषेबद्दल आपले विचार स्पष्टपणे मांडले.पत्रकारांनी मंत्री अशोक उईके यांना हिंदीमध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला आहे. माझी आई निरक्षर होती, पण तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले. मला तीच भाषा येते. मला हिंदी येत नाही. त्यामुळे हिंदी माध्यमांशी मी हिंदीत बोलणार नाही, मी फक्त मराठीत बोलणार. मंत्री उईके यांनी केलेल्या या विधानाचा बॅनर आता मनसेकडून मुंबईत लावण्यात आला आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, मंत्री अशोक उईके हे भाजपाचे असतील पण त्यांनी त्यांना मराठीशिवाय दुसरी कोणती भाषा येत नाही, हे स्पष्टपण सांगितले असल्याचे किल्लेदार यांनी म्हटले आहे. उईके यांनी केलेल्या विधानाचा अर्थ हाच होतो की, आमच्या भूमिकेशी साधर्म्य असणारे त्यांचे विधान आहे. त्यामुळे ते जरी भाजपाचे मंत्री असले तरी त्यांचे अंतर्मन हे आमच्या भूमिकेशी सहमत आहे आणि हे लोकांना कळले पाहिजे, त्यामुळे या उद्देशाने मंत्री अशोक उईके यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. Hindi compulsion