विशेष प्रतिनिधी
मुंबई : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप 78, शिवसेना शिंदे गट तीन, काँग्रेस 13 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले होते. फक्त महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हाच प्रश्न होता. त्याचेही उत्तर आज मिळाले, भाजपकडून डिंपल मेहता यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 79 मते मिळाली. डिंपल मेहता या मिरा-भाईंदरच्या महापौर झाल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआर मधील पहिला अमराठी महापौर मिरा-भाईंदरमध्ये नियुक्त होत असल्याने मराठी, अमराठी वाद सुरु झाला आहे. Mira-Bhayandar
मिरा-भाईंदर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात कोणाचाही अर्ज आलेला नसल्यामुळे त्यांची महापौर पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे एमएमआरमध्ये प्रथमच अमराठी महापौर नियुक्त झाला आहे. यामुळे मराठी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह त्यांनी आंदोलन सुरु केले. मिरा-भाईंदर महापालिकेत मराठीच महापौर असला पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. Mira-Bhayandar
मिरा-भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौरच असला पाहिजे, या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून आज मिरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. मिरा भाईंदर महापालिकेमध्ये आज भाजपचा महापौर हा पदभार स्वीकारणार आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मिरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर करा अशी मागणी केली आहे. एक महिन्यापासून आमची हीच मागणी आहे. डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत आमचा पहिल्या वेळेस सुद्धा त्यांना विरोध होता. मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आहेत. म्हणूनच डिंपल मेहतांना दुसऱ्यांदा महापौर केले जात आहे. मिरा-भाईंदर हे आगरी, कोळी यांचे हे शहर आहे. त्यामुळे महापौर मराठीच असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.