विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही मुंबईत भाजपसोबत जाणार नाही, मी सांगतोय ना, नाही म्हणजे नाही, अशा स्पष्ट शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासाेबत जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले. Raj Thackeray
मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने मिळून बहुमताचा आकडा गाठला. यानंतर आता मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये महापौर निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत भाजपाला महापौर होण्यासाठी मनसे पाठिंबा देणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली. यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. Raj Thackeray
कल्याण-डोंबिवली मनपात मनसेने पाठिंबा दिला. कारण सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यास होणारा फायदा लक्षात घेऊन ते सोबत आले. मनसेने कोणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. मुंबईतील मनसेचा नगरसेवकांचीही तीच इच्छा असावी, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाली. मनसे पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थावर झाली. या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दर काही दिवसांनी पक्षामध्ये बदल होत असतात. त्याप्रमाणे बदल होतील. निवडणुकीचा अनुभव, निवडणुकीत कोणी काम केले, नाही केले याची चर्चा या बैठकीत झाली. भाजपाला पाठिंबा देण्यावर बोलताना, अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही. अशा प्रकारचे कुठलेही समर्थन देण्याचा विषय नाही, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. बैठक संपवून बाहेर पडताच राज ठाकरे यांनी भाजपासोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांचे खंडन केले. Raj Thackeray .
दरम्यान, वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची नियोजित बैठक होती. या बैठकीला मुंबईतील मनसेचे सर्व पराभूत उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हजर होते. या बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी लवचिक राजकीय धोरणाबाबत भाष्य केले. माझे हे लवचिक राजकीय धोरण वैयक्तिक हितासाठी नव्हे तर मनसेच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.