Raj Thackeray : राज ठाकरे वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, पत्र लिहून सांगितले कारण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. त्याचे कारण सांगणारे पत्र त्यांनी मनसैनिकांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले



राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र! येत्या 14 जून 2025 ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी… पण मनापासून सांगतोय की असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.

गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही, पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या पत्रात म्हटले आहे.

 

Raj Thackeray will not meet workers on his birthday, wrote a letter stating the reason

महत्वाच्या बातम्या