Sharad Pawar : हिंदी विरोधावरून शरद पवारांचा ठाकरे बंधूंना सबुरीचा सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई: देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे .

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याअंतर्गत पहिलीपासून विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा शिकणे अनिवार्य राहणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र दादा भुसे यांची मागणी फेटाळत राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही मोर्चात सहभागी होणार आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हिंदी भाषा सक्तीवर आपली भूमिका मांडली आहे.

पवार म्हणाले की, माझ्या मते या सगळ्यांचा जो आग्रह आहे, तो प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करू नये असा आहे. मलाही वाटतं की, पाचवी नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. पण लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा, याचा देखील विचार करावा लागेल. कारण दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजुला पडली तर हे योग्य नाही. म्हणून पाचवी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा.

शरद पवार म्हणाले की, ठाकरे बंधू जे काही बोलले, त्यांचे स्टेटमेंट काही चुकीचं नाही. त्यामध्ये, कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, मराठी भाषेवरून एकत्र येण्यासाठी ते भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. याचवेळी शरद पवारांना विचारण्यात आले की, राज ठाकरे 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहेत, तर तुम्ही जाणार का? यावर ते म्हणाले की, तुम्ही मला जे सांगताय, त्याबाबत मला काहीच माहिती नाही. परंतु कुठलाही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार आहेत, तर त्यांना बोलू द्या, मग निर्णय घेऊ. पण, आमचा दृष्टिकोन निगेटीव्ह नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 जुलैला गिरगाववरून मोर्चा काढणार आहोत. राज ठाकरे यांनी सांगितले की, या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्यामुळे आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे,” अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. तर दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, 7 जूलै रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलन केले जाणार आहे. विधिमंडळातील सर्व आयुध वापरून ठाकरेंचा पक्ष मदत करेल, अशी माहिती दिली. Sharad Pawar

 Sharad Pawar advice to Thackeray brothers on opposition to Hindi

महत्वाच्या बातम्या