Shiv Sena : मुंबई महापालिकेच्या महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना गटाकडून आक्षेप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौर कोण होणार? याकडे लागलं आहे. अशातच राज्यातील या महानगरपालिकांमध्ये सत्तास्थापनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या महापौरपदाची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 जानेवरी) सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात जाहीर झाली.



यावेळी भाजपाकडून महामंत्री राजेश शिरवडकर, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद परांजपे उपस्थित होते.

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी कुठं एससी, कुठं एसटी प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. तर काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी सोडत निघाली. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यात मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं भाजपाचा महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या की, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण हे यावेळी एसटी प्रवर्गासाठी असेल. पण ते यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. यावेळी मुंबई महिला ओबीसी ही चिट्टी टाकली नाही. अद्याप महिला ओबीसी झालेली नाही. 2019, 2022 हे महापौरपद खुल्या प्रवर्गातील होतं. त्यामळं ओबीसी यायला हवं होतं. ओबीसींवर अन्याय केला. आता त्यांनी नियम बनवला. एसटी उमेदवार तीन असायला पाहिजेत. मगच.. म्हणजे तुम्ही जाणूनबुजून आमच्याकडे एसटीचे दोन उमेदवार आहेत. त्यामुळं मुंबईत तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली. त्यामुळं आम्ही या सर्व प्रक्रियेचा निषेध करतो, असं म्हणत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपेक्ष नोंदवला आहे.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या आक्षेपावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं की, त्यांचा आक्षेप हा कुठल्याही नियमाला धरुन नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं. त्यासाठी काय करता येईल. या पद्धतीचा आरडा ओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बराचवेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे आक्षेप आता घेतले, त्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं की नियमानुसार प्रशासनानं कारवाई पूर्ण केली आहे. आम्ही त्यांचे आक्षेप विचारात घेऊ. त्यांचा आक्षेप होता की, आम्हाला मुंबईत एसटी का दिलं नाही, ओबीसी का दिलं नाही. मुंबईत हे का नाही दिलं, तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचे लाईव्ह चित्रण दाखवलं आहे. त्यामुळं त्यांच्या आक्षेपामध्ये काही नाही.

Shiv Sena Faction Raises Objections to BMC Mayor Reservation Draw