जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. गरज पडल्यास या तपासासाठी जागतिक स्तरावरील निष्णात संस्थांची मदत घ्यावी, पण सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, विमान अपघाताचा तपास करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. आजवर या प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्या सर्व बाबींचा सखोल तपास व्हावा. भारत सरकारच्या स्वायत्त संस्था आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत चौकशी सुरू आहेच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सीआयडी (CID) चौकशीचे आदेश दिले आहेत.

तटकरे यांनी सांगितले की, आम्ही केवळ मागणी करून थांबलो नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीही तत्परता दाखवत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ही मागणी वर्ग केली असून, त्यानुसार आता सीबीआय तपास सुरू झाला आहे.

अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना भावूक हाेत तटकरे म्हणाले की, अजितदादा आणि माझा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी आमच्यात झालेली दोन तासांची चर्चा आजही स्मरणात आहे. त्यांनी मला राजकारणात अनेक संधी दिल्या. माझी लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही केवळ त्यांच्या शब्दखातर मी निवडणूक लढलो. मात्र, यश मिळाल्यानंतर दादांचा असा अपघाती मृत्यू होणे हे धक्कादायक आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. अजितदादांचा एकनिष्ठ सहकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना संधी मिळावी, ही आमची ठाम भूमिका होती. ज्यांना टीका करायची आहे त्यांनी ती खुशाल करावी, पण आम्ही आमचे प्रामाणिक कर्तव्य पार पाडले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

Seek help from global organizations but clear doubts, Sunil Tatkare demands regarding plane crash