Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता हिंदी सक्तीचा प्रस्ताव, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray  राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते. डॉ. माशेलकर समितीचा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता. मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील शिवसेना ठाकरे गटाकडूनजाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केले जात आहे, असा गौप्यस्फोट उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.Uddhav Thackeray

सामंत म्हणाले, हिंदीची सक्ती कुठेही करायची नाही आणि हिंदी अनिवार्य देखील करायची नाही, ही शासनाची भूमिका आहे. मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्याने काहीजण या मुद्द्याचे राजकारण करत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या या समितीने इयत्ता पहिले ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत, असा अहवाल सरकारला सादर केला होता. तो अहवाल 27 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला होता.

राज्यात शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार बारावीपर्यंत हिंदी सक्तीबाबत उबाठाने हरकत का घेतली नाही? असा सवाल करत सामंत म्हणाले, ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात हिंदी सक्ती लागू झाली, तेच आता हिंदी भाषेबाबत मोर्चा काढत आहेत, ही दुटप्पी भूमिका आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण भावनिक साद घालून मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण करत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना काय करू शकते, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले, असे ते म्हणाले. तसेच मराठी साहित्यिकांची भूमिका समजून घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात साहित्यिकांची बैठक घेणार आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून वेळ पडल्यास राज ठाकरे यांची भेट घेऊ, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray accepted the proposal to make Hindi mandatory when he was the Chief Minister, Uday Samant reveals

महत्वाच्या बातम्या