Thackeray brothers तुमची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकली? भाजपाचा ठाकरे बंधूंना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजपने ठाकरे बंधूंना प्रश्न करायला सुरुवात केली आहे. तुमची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकली? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. Thackeray brothers

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करत विरोधी पक्ष आणि प्रामुख्याने ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. आता हिंदी सक्तीच्या निर्णयाला समर्थन करण्यासाठी भाजपा नेते मैदानात उतरले आहेत. आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्यानंतर आता अमित साटम यांनी देखील हिंदी सक्तीबाबत भूमिका मांडली आहे.



पत्रकारांशी बोलताना अमित साटम म्हणाले की, कोणत्याही प्रकारची हिंदीची सक्ती नाही, असे स्पष्टीकरण सरकारने वारंवार दिलं आहे. पण तरीही मराठीच्या नावावर काही लोक राजकारण करत आहेत. खरं तर ते त्यांचं स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता राजकारण करत आहेत. अशा लोकांना माझा एकच सवाल आहे की, राजकारणासाठी मराठी आणि स्वत:च्या कुटुंबीयांकरता इंग्रजी व इतर विदेशी भाषा, असं का केलं जातं आहे. सर्व सामान्य मराठी माणूस यांना प्रश्न विचारत आहे, तुमची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकली? त्यांनी शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये असताना मराठीला सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा निवडल्या होत्या? या दोन प्रश्नांची उत्तर आधी त्यांनी द्यावी आणि नंतर मराठीच्या नावावर राजकारण करावं, असे आवाहन अमित साटम यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 जुलैला गिरगाववरून मोर्चा काढणार आहे. यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरे यांनी सांगितले होते की, या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्यामुळे आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले होते. याचपार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगतिले की, राज ठाकरे यांनी त्यांना फोन केला होता. राज ठाकरे यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता 5 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार का? हे पाहावे लागेल.

Which medium of education did your children study in? BJP questions Thackeray brothers

महत्वाच्या बातम्या