विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता केवळ लोकनियुक्त लोकप्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता तब्बल ७ स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या नव्या नियमांमुळे वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.
हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू
शासनाच्या या नवीन अधिसूचनेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीच्या कार्यवाहीला वेग येणार आहे.
यापूर्वीच विधिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीच्या तरतुदीला मंजुरी दिली होती. या तरतुदीनुसार, प्रत्येक जिल्हा परिषदेत किमान ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करता येतील. तसेच एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची मुभा शासनाने दिली आहे. याच सूत्रानुसार पुणे जिल्हा परिषदेत ७ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे. फक्त जिल्हा परिषदच नव्हे, तर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमध्येही आता स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे नवे गणित:
स्वीकृत सदस्यांच्या एन्ट्रीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे एकूण संख्याबळ आता वाढणार आहे.
विद्यमान लोकनियुक्त सदस्य: ७३
नवे स्वीकृत सदस्य: ०७
एकूण सदस्यसंख्या: ८० वर पोहोचणार
तज्ज्ञांची संधी की राजकीय पुनर्वसन?
तज्ज्ञ व्यक्तींना संधी मिळणार असली, तरी या नियुक्तीसाठी संबंधित राजकीय पक्षाचा पाठिंबा आणि शिफारस अत्यंत अनिवार्य असणार आहे. त्यामुळे या ७ जागांवर वर्णी लावण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील सद्यस्थिती पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५१ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे साहजिकच स्वीकृत सदस्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Experts to Enter Pune Zilla Parishad! Member Strength to Reach 80 with the Appointment of 7 Nominated Members!
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा