CM announces शेतकऱ्यांचे 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लवकरच राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. CM announces

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. ते म्हणाले, साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांचे सध्याचे वीज बिल सरकारने आधीच माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नावावर जुनी थकीत बिले कागदोपत्री तशीच होती. यामुळे नवीन कनेक्शन घेताना किंवा इतर कामांत शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर जुन्या बिलांची टांगती तलवार नको, त्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे. वीज बिल माफ केले म्हणजे वीज कंपनी स्वतःच्या खिशातून पैसे भरत नाही. सर्वसामान्यांच्या बिलावर हा भार पडू नये म्हणून, राज्य सरकार दरवर्षी अर्थसंकल्पातून 25 हजार कोटी रुपये वीज वितरण कंपनीला देत आहे. CM announces

मुख्यमंत्री म्हणाले, रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना सर्पदंश आणि इतर अनेक जीवघेण्या संकटांचा सामना करावा लागतो. यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी सरकारने ‘सौर कृषी वाहिनी’ आणि ‘सौर पंप’ योजना आणल्या आहेत. सध्या राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. या वर्षाअखेरपर्यंत हे प्रमाण 100 टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाईल. CM announces



दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणार्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, या योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने सुरुवातीला काही अटी घातल्या होत्या. मात्र, आमदारांच्या आग्रहानंतर त्या अटी रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आर्थिक शिस्त लागावी म्हणून 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना या नवीन योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र, महायुतीच्या 25-30 आमदारांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही अट रद्द करण्याची विनंती केली. यामुळे 12 लाख शेतकरी वंचित राहिले असते. आमदारांचा आग्रह योग्य वाटल्याने सरकारने ही अट रद्द केली. आता जुन्या योजनेत पात्र ठरूनही नंतर थकीत झालेल्या 12 लाख शेतकऱ्यांनाही या 2 लाखांच्या कर्जमाफीचा सरसकट लाभ मिळणार आहे.

यंदा ‘अल निनो’चे संकट असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी आणि दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत प्रोत्साहनपर 50 हजार रुपये मिळवण्यासाठी ‘चालू वर्षाचे कर्ज भरणे आवश्यक आहे’ ही अट अन्यायकारक असल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही अटही रद्द केली. आता मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक आहे, अशा शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर न सोडता, त्यांनी 2 लाखांवरील रक्कम भरल्यास त्यांनाही 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा दिला जाईल.

कर्जमाफी हा शेतीच्या प्रश्नांवरचा अंतिम उपाय नाही. कर्जमाफीने शेतकरी कर्जाच्या विळख्यातून कायमचा बाहेर पडत नाही. शेती उद्योगासारखी फायद्यात आणायची असेल, तर त्यात नवीन तंत्रज्ञान आणि गुंतवणूक येणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकार येत्या दोन-तीन वर्षांत राज्यात ५० हजार ‘गटशेती’ गट तयार करणार असून, त्यांना आवश्यक त्या सर्व योजना आणि निधी पुरवला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Maharashtra waives 48,000 crore pending power dues of farmers, CM announces

महत्वाच्या बातम्या