विशेष प्रतिनिधी
ठाणे :- कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत Vinayak Raut आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.याप्रकरणी ठाणे न्यायालयातून एक अत्यंत महत्त्वाची आणि कायदेशीर अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप न्यायालयात अंतिम सुनावणी झालेली नाही. मात्र, या मुख्य अर्जावर सुनावणी होईपर्यंत पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, अशी मागणी करणारा राऊत पिता-पुत्राचा ‘अंतरिम अर्ज’ न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्या मुख्य जामीन अर्जावर अद्याप निर्णय होणे बाकी असले, तरी कोर्टाने अंतरिम अर्ज नाकारल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कापूरबावडी पोलीस त्यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात.
वकिलांनी दिली माहिती
या प्रकरणातील फिर्यादी गिरीजा राऊत यांना आज न्यायालयाच्या या आदेशाची प्रत मिळाली आहे. गिरीजा राऊत यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. सागर कदम यांनी या कायदेशीर बाबीवर प्रकाश टाकला. ॲड. सागर कदम यांनी स्पष्ट केले की, “या केसमध्ये दोन कलम अजामीन पात्र असल्याने ठोस पुरावे आढळल्यास पोलीस कधीही अटकेची कारवाई करू शकतात” असे सागर कदम म्हणाले.
गिरीजा राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळल्यानंतर फिर्यादी गिरीजा राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.” गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत राऊत कुटुंबीयांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचेही गिरजा राऊत यांनी स्पष्ट केले.
मूळ प्रकरण काय आहे?
विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांच्या विरोधात त्यांची सून गिरजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सासरच्या मंडळींकडून त्यांचा कौटुंबिक छळ केला जात होता. तसेच या छळात काही भोंदू बाबांचा वापर करून जादूटोणा केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा आणि कौटुंबिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत आतापर्यंत दोन भोंदू बाबांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर विनायक राऊत आणि इतर संशयितांविरोधात पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 23 जुलै रोजी पार पडणार आहे.
Trouble mounts for Vinayak Raut in a domestic violence case.
महत्वाच्या बातम्या