राज ठाकरे हास्यास्पद म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना मनसे नेत्याची चोपेल अशी धमकी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चा काढणार आहेत. यावरून राज ठाकरे हे हास्यास्पद बनत चालले आहेत अशी टीका करत मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या विरोधावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांना थेट चोपेल अशी धमकी दिली आहे.

सदावर्ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. त्याला आमचा विरोध असून ठाकरेंचा मोर्चा अन्यायकारी आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्यांचा हा मोर्चा बेकायदेशीर आहे. राज ठाकरे यांची राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाली आहे.



यावर अविनाश जाधव म्हणाले, सदावर्ते हा भाजपने पाळलेला माणूस आहे. या आधी सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्याने उडी मारली. एवढीच हिम्मत असेल तर जा न तिकडे साऊथमध्ये. तू स्वतःला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडे जाऊन विरोध करून दाखव. सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरुद्ध काम करतो, याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मी खात्रीने सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल. आमची भाजपला विनंती आहे की, याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर याच्या तोंडात दात नसतील.

अविनाश जाधव म्हणाले, माझा मुलगा चौथीमध्ये आहे. सध्या तो बोलताना मराठी आणि हिंदी मिक्स करायला लागला आहे. हा जो विषय अनेकांच्या मुलांना होतोय त्यांना दोन भाषा एकत्र कराव्या लागल्या. पहिले वाक्य मराठीमध्ये, दुसरे दोन वाक्य हिंदीतले बोलून जातील. हा त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम आहे. आमच्या एका पदाधिकाऱ्याने हा विषय मांडला. हे सरकारला कळत नाही, त्यांना दिल्लीचे मनसुबे पुढचे आहेत, ते टिकवायचे आहेत. म्हणून हे सर्व चालू आहे. पण, आम्ही हे कधीही खरे होऊ देणार नाही.

Gunaratna Sadavarte, who called Raj Thackeray ridiculous, receives threat of being beaten by MNS leader

महत्वाच्या बातम्या