विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंढवा परिसरातील तब्बल ४० एकर सरकारी जमिनीच्या कथित बेकायदा विक्रीप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवत सहआरोपी अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किसनचंद तेजवानी याच्याविरोधात १८८६ पानांचे सविस्तर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासात समोर आलेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे आता १८० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंढवा येथील ही ४० एकर जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मालकीची असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, या जमिनीच्या मूळ वतनदारांच्या वारसदारांचे कथित कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) तयार करून शीतल तेजवानी याने ही जमीन अमेडिया कंपनीला परस्पर विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारात सरकारी नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, सुमारे १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या या जमिनीचा व्यवहार अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारादरम्यान दस्तनोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्काची चोरी करण्यात आली असून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण व्यवहारात बनावट कागदपत्रे, चुकीची मालकी माहिती, तसेच सरकारी जमिनीवर खासगी हक्क दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, दस्तऐवज, नोंदणी कार्यालयातील कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर दिग्विजय पाटील यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आल्याने त्यांचे नाव पुरवणी आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले.
या प्रकरणामुळे पुण्यातील जमीन व्यवहारांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सरकारी जमिनींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, व्यवहाराशी संबंधित आर्थिक साखळी, निधीचे स्रोत आणि दस्तऐवज तयार करणाऱ्या घटकांचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Supplementary chargesheet filed against Amedia company director Digvijay Patil in Mundhwa 40-acre government land scam
महत्वाच्या बातम्या