Devendra Fadnavis : ‘समृद्धी ची स्वप्नपूर्ती, आता शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

नाशिक : 2014 साली आम्ही जे स्वप्न बघितले, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ प्रवासाचा मार्ग नाही, तर तो महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा महामार्ग आहे,” असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले. समृद्धी ची स्वप्नपूर्ती झाली आता शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचा इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा नाशिकजवळ पार पडला.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होती.

फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या 520 किमी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. आज 625 किमीचा महामार्ग कार्यान्वित आहे आणि सुमारे 2 कोटी वाहनधारकांनी याचा वापर केला आहे. आता अंतिम 76 किमी उर्वरित टप्प्यामुळे संपूर्ण 701 किमी समृद्धी महामार्ग खुला झाला आहे. हा महामार्ग भारतातील पहिल्या ‘स्मार्ट हायवे’पैकी एक ठरणार आहे. या मार्गावर एकूण 73 पूल, 5 जुळे बोगदे आणि वन्यजीवांसाठी अंडरपास-ओव्हरपासची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बोगद्यांमध्ये सेन्सरद्वारे तापमान 60 डिग्री सेल्सिअसवर गेल्यास आपोआप पाणी फवारणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यावर ती थांबते. पर्यावरणस्नेही धोरणांतर्गत महामार्गावर 200 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची तयारी आहे.

“गेल इंडिया लिमिटेडने संपूर्ण मार्गावर गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या औद्योगिक प्रकल्पांना सरळ गॅसपुरवठा करता येईल. उदाहरणार्थ, गडचिरोलीतील स्टील उद्योग,” असे सांगत फडणवीस यांनी यातून महाराष्ट्रात नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली. महामार्गावर 22 ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार असून ट्रॅफिकच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळणार आहे. “शिर्डी व अजिंठा मार्गांवर आधी मासिक ट्रॅफिक 2 लाख होते, आता ते 10 लाखांवर गेले आहे. अंतिम टप्प्यानंतर यात आणखी वाढ होईल,” असे ते म्हणाले.

“ज्यावेळी या प्रकल्पाला सुरुवात झाली, तेव्हा अनेकांना वाटले होते की हे शक्य नाही. मात्र महायुती सरकारच्या कालावधीत आम्ही हे साध्य केले. आणि आनंदाची बाब म्हणजे उद्घाटनही महायुतीच्याच कार्यकाळात होत आहे,” असे सांगत फडणवीस यांनी पुढच्या टप्प्यातील ‘शक्तीपीठ महामार्ग’ या नव्या प्रकल्पाचे संकेत दिले. “हा महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा ठरेल आणि आर्थिक क्रांती घडवेल. लवकरच त्याचेही काम सुरू करणार आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशी पुलावरील वाहतूक कोंडीबाबतही चिंता व्यक्त केली. “वाशी पुलावर अनेकदा ट्रॅफिक जॅम होतो. आता नव्या पुलाचे लोकार्पण करून त्यात मोठा बदल घडवून आणू,” असे ते म्हणाले.

समृद्धी महामार्गाचा हा टप्पा पूर्ण झाल्याने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांसारख्या मागास भागांना प्रत्यक्षात आर्थिक आणि औद्योगिक गती मिळणार आहे. हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे नव्हे तर महाराष्ट्राच्या भविष्याचे स्वप्न आहे, असे त्यांनी सांगितले.

The dream of Samruddhi Highway has been fulfilled, now the dream of Shakti Peeth Highway, asserts Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या