विशेष प्रतिनिधी
रायगड : Dhananjay Munde: राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत (जिल्हा रायगड) येथे झालेल्या सभेत मंचावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे एक मागणी केली. धनंजय मुंडे यांच्या या मागणीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सध्या राजकीय अज्ञातवासात असल्याचे चित्र आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मीक कराड यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांची राजकीय वाताहत सुरू झाली. या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. परंतु आता त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी मंचावरून सुनील तटकरे यांना उद्देशून म्हटले, “काही चुकलं असेल तर कान धरा. चूक कोणाकडून होत नाही? आता मला रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या.” धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी केली. मंत्रिपद गेल्यापासून धनंजय मुंडे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांना जबाबदारी दिली जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले होते. परंतु अद्याप त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
सुनील तटकरे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव
दरम्यान, आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. “सुनील तटकरे हे कोकणाचे विकासपुरुष आहेत,” असे धनंजय मुंडे म्हणाले. “माझ्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत सुनील तटकरे यांचा वडिलांप्रमाणे भक्कम वाटा आहे. तटकरे यांना काम करण्यासाठी कागदाची गरज लागत नाही. देशाच्या संसदेत काम करताना त्यांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली नवतरुण चेहऱ्यांना संधी देत पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेले,” असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला आता पक्षश्रेष्ठी काय प्रतिसाद देतील, हे पाहावे लागेल.
If something is wrong, listen! But now give me some work, demands Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!