मी धर्मसंकटात: ओमराजे 20 जूननंतर घेणार अंतिम निर्णय; आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा, महायुती नेतृत्वाचे कौतुक

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : शिवसेना (ठाकरे) पक्षातील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर थेट नाराजी व्यक्त करत मोठे राजकीय संकेत दिले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षातील सध्याच्या परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडताना आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये फिरत असतात. ते स्वतः मैदानात उतरून कामे करतात. उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सतत दौरे करणे शक्य नसले, तरी पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रियपणे राज्यभर फिरणे अपेक्षित होते.

पक्ष सोडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ओमराजे यांनी आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे सांगितले. “भावनिकदृष्ट्या विचार केला तर पक्ष सोडणे चुकीचे वाटते, पण राजकीय वास्तव पाहिले तर हा निर्णय योग्य वाटतो.
बंडखोरीमागील कारणे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांना निवडून आणणे कठीण होत आहे. भविष्यात राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मजबूत संघटन आणि सत्तेची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदारसंघातील रस्ते, पूल, वीज वितरणाशी संबंधित डीपी आणि इतर विकासकामांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही निधीअभावी कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र सत्तेचा पाठिंबा आणि विकासनिधी नसल्यास अनेक कामे रखडतात. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.



दरम्यान, पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर किंवा ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे आश्वासन मिळाल्याच्या चर्चांचा त्यांनी ठाम इन्कार केला. “माझा कोणताही निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठीच मी पुढील पाऊल उचलणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, आपले वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा न्यायालयीन निकाल आणि कार्यकर्त्यांशी व्यापक चर्चा यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. “20 जूननंतर माझी भूमिका स्पष्ट करेन,” असे वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकीय चर्चांना अधिकच हवा दिली.

Omraje to announce final decision after June 20; targets Aaditya Thackeray, praises Mahayuti leadership

महत्वाच्या बातम्या